कालच एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीतील जीडीपीचा विकास दर जाहीर झाला. जीडीपीमध्ये ४० वर्षातील सर्वात मोठी घसरण झाली आहे. करोना लॉकडाउनमध्ये सर्व क्षेत्रात शांतता असताना देशाचा गाडा हाकला तो एकट्या शेतकऱ्याने अर्थात कृषी क्षेत्राने होय.
या वर्षी कृषी क्षेत्र हे एकमेव असे क्षेत्र आहे ज्यात सकारात्मक वाढ झाली आहे. चांगला मान्सून, लॉकडाउनमुळे प्रवासी मजूर गावी पोहोचल्यामुळे कृषी कार्यात वेग आला. यामुळे कृषी आणि शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले की देशाची अर्थव्यवस्थेचा गाडा तेच खऱ्या अर्थाने चालवतात. जेव्हा इतर क्षेत्रात शांतता होती तेव्हा कृषी क्षेत्राने अर्थव्यवस्थेची साथ सोडली नाही.
पहिल्या तिमाहीत कृषी क्षेत्राने ३.४ टक्के इतकी वाढ नोंदवली. विशेष म्हणजे गेल्या वर्षी या कालावधीत कृषी क्षेत्रातील वाढ ही ३ टक्क्यांनी झाली होती. याचा अर्थ संकट काळात कृषी क्षेत्राने अधिक चांगली कामगिरी केली. लॉकडाउनच्या काळात संपूर्ण देश ठप्प होता. या काळात शेतकरी मात्र देशाच्या अर्थव्यवस्थेचा गाडा ओढत होता, हेच या आकडेवारीतून समोर आले आहे.
'करोना'मुळे अर्थव्यवस्थेचे तीनतेरा!
कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशात जवळपास अडीच महिने कठोर टाळेबंदी लागू करण्यात आली होती. या काळात देशात उद्योगधंदे ठप्प पडले. बेरोजगारी वाढली देशांतर्गत वस्तूंचा खप कमी झाला. याची मोठी किंमत अर्थव्यवस्थेला चुकवावी लागली आहे. एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेची वाढ नव्हे तर अधोगती झाल्याची कबुली केंद्र सरकारने दिली आहे. पहिल्या तिमाहीत विकासदर (जीडीपी) उणे २३.९ टक्के इतका प्रचंड खाली घसरला आहे. ४० वर्षांत पहिल्यांदाच जीडीपीमध्ये इतकी मोठी घसरण झाली आहे.
सरकारने अर्थव्यवस्थेतील प्रमुख आठ घटकांच्या (core sector) वृद्धीविषयक आकडेवारी जाहीर केली. ज्यात जुलै महिन्यात या प्रमुख आठ क्षेत्रांच्या वाढीचा दर उणे ९.६ टक्के राहिला. जून महिन्याच्या तुलनेत यात किंचित सुधारणा झाली. जून महिन्यात तो उणे १२.९ टक्के होता.