मराठा आरक्षण संदर्भात सरकार व विरोधी पक्ष नेते यांच्यात आज संध्याकाळी बैठक संपन्न झाली.
यामध्ये, 'सरकार म्हणून मराठा आरक्षण संदर्भात न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्व तज्ञांची विचारविनिमय करून निर्णय घेतला जाईल, आंदोलन करू नये, आम्हीही आंदोलन करणारेच आहोत', असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचित केले.
तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठा समाजात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे, आम्ही राज्य सरकारला पूर्ण सहकार्य करु.
------------------------------------
'दंड भरला म्हणजे निकाल मान्य आहे असे नाही': प्रशांत भूषण
सर्वोच्च न्यायालय अवमान प्रकरण
दंड भरण्यासाठी देशभरातुन मिळालेल्या योगदानातून ट्रुथ फंड तयार करणार
नवी दिल्ली : ‘न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ठोठावलेला एक रुपया दंड भरला म्हणजे, मला हा निकाल मान्य आहे, असे नव्हे. या निकालाविरोधात आम्ही पुनर्विचार याचिका दाखल करणार आहोत’, असे सामाजिक कार्यकर्ते व वकील प्रशांत भूषण यांनी सांगितले.
न्यायालयाच्या विरोधात ‘ट्विट’ केल्याप्रकरणी भूषण यांना दोषी धरण्यात आले. त्या ट्विटबद्दल भूषण यांनी माफी मागण्यास नकार दिला होता. त्यावर न्यायालयाने त्यांना एक रुपया किरकोळ दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम १५ सप्टेंबरपर्यंत भरण्यात यावी आणि हा दंड भरला नाही, तर तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागेल. तसेच तीन वर्षांसाठी वकिली करता येणार नाही, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले होते.
न्यायालयाच्या आदेशानुसार भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये दंड भरला. तत्पूर्वी पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केले. ते म्हणाले, ‘दंड भरण्यासाठी माझ्याकडे देशाच्या कानाकोप-यातून योगदान आले. या पैशातून ‘सत्य निधी’ (ट्रुथ फंड) तयार केला जाईल. यापुढे असहमती दर्शविणारी मते व्यक्त केल्याबद्दल ज्यांच्यावर खटला चालवला जाईल, त्यांना कायदेशीर मदतीसाठी या निधीचा वापर केला जाईल. विरोधात बोलणा-यांचा आवाज दाबण्यासाठी सरकार सर्व मार्ग अवलंबत आहे. सरकारच्या छळाला सामोरे जाणा-यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी ‘सत्य निधी’चा वापर केला जाईल.’ तसेच अवमान खटल्यात शिक्षा सुनावण्यासाठी अपील प्रक्रिया तयार करावी, यासाठी एक रिट याचिका देखील दाखल केली असल्याचे भूषण यांनी सांगितले.
----------------------------------------------------
'आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, तर ते चिघळण्याचीच शक्यता जास्त'
पोलीस प्रशासनाकडून वैयक्तिक फोन करुन, नोटीसी बजावून आंदोलकांच्यावर दबाव आणण्याचा प्रकार सुरु.
अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे. “लोकशाही मार्गाने लढा उभारणे हा प्रत्येक व्यक्ती आणि समाजाचा अधिकार आहे. त्या अधिकाराची गळचेपी न करता, मराठा समाजाला आपली नाराजी व्यक्त करण्याची मुभा देण्यात यावी” असे संभाजीराजे यांनी पत्रात लिहिले आहे.
“मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यानंतर समाजामध्ये अस्वस्थतेचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे समाजातील संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. जिल्हास्तरावर सकल मराठा समाजाच्या बैठका होत आहेत आणि आंदोलनाची दिशा ठरत आहे. परंतु पोलीस प्रशासनाने काही आंदोलकांना नोटीस बजावणे सुरु केले आहे. नाशिक, पुणे आणि मराठवाड्यातील आंदोलकांना पोलीस प्रशासनाने वैयक्तिक फोन करुन आणि नोटीसी बजावून आंदोलकांच्यावर दबाव आणण्याचा प्रकार सुरु केला आहे” असे संभाजीराजे यांनी पत्रात लिहिले आहे.
“मराठा समाज हा आक्रमक म्हणून ओळखला जातो. जिथे अन्याय झाला तिथे न्यायाची बाजू घेऊन लढणारा हा समाज आहे. मग तेव्हा त्याने कधीच जात, पात, धर्म पाहिला नाही. सर्वांसाठी लढण्याची भूमिका घेतली. आज हा लढा स्वतःसाठीच उभारण्याची वेळ आली आहे. देशरक्षणार्थ नेहमीच सज्ज असणारा हा समाज कायद्याचे पालन करणारा आहे. मूक मोर्चा वेळी सर्व जगाने ते पाहिले आहे.” असा दाखलाही संभाजीराजेंनी दिला.
“न्याय्य हक्कासाठी लोकशाही मार्गाने लढा उभारणे हा प्रत्येक व्यक्ती आणि समाजाचा अधिकार आहे. त्या अधिकाराची गळचेपी न करता, मराठा समाजाला आपली नाराजी व्यक्त करण्याची मुभा देण्यात यावी. त्या उपरही जर प्रशासनाने सहकार्य न करता आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, तर ते चिघळण्याचीच शक्यता जास्त आहे. त्यामुळे आपणास आमची मागणी हीच राहील की, आंदोलकांना पोलीस आणि प्रशासनाने सन्मानाची वागणूक द्यावी” असे संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
शरद पवारांनी मराठा आरक्षणामध्ये मध्यस्थी करावी - छत्रपती संभाजीराजे
न्यायालयाने मराठा आरक्षण कायद्याला अंतरिम स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत शरद पवारांनी मराठा आरक्षणामध्ये मध्यस्थी करावी, अशी विनंती संभाजीराजेंनी शरद पवारांना यावेळी केली.
----------------------------------------------------
लातूर जिल्हा :
उस्मानाबाद जिल्हा :
आज प्राप्त झालेल्या 487 RTPCR अहवालांपैकी 142 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 285 अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत. 58 अहवाल इनकन्क्लूजीव आढळून आले आहेत. तसेच आज 555 Rapid Antigen Test पैकी 163 रुग्ण पॉझिटिव्ह तर 392 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.
RTPCR आणि Rapid Antigen Test दोन्ही मिळून 305 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 9299 झाली आहे तर 6799 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 2233 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 267 वर पोहोचला आहे.
----------------------------------------------------