धोनी आपल्या अखेरच्या सामन्यात रनआऊट झाला होता, त्यामुळे एक विचित्र योगायोग आता धोनीच्या कारकिर्दीबाबत पाहायला मिळत आहे. धोनीने आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना १० जुलै २०१९ या दिवशी इंग्लंडमधील क्रिकेट विशवचषकात खेळला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात धोनीने आपले अर्धशतकही पूर्ण केले होते. धोनी भारताला हा सामना जिंकवून देईल, असे वाटत होते. पण धोनी चोरटी धाव घ्यायला गेला आणि रनआऊट झाला होता. पण धोनी आपल्या अखेरच्याच सामन्यात रन आऊट झाला नव्हता, तर कारकिर्दीतील पहिल्या सामन्यातही धोनी रन आऊट झाला होता. धोनीने आपला पहिला सामना २३ डिसेंबर २००४ या दिवशी खेळला होता. पण या सामन्यात धोनी पहिल्याच चेंडूवर रन आऊट झाला होता.
आयपीएलमध्ये खेळणार
भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला असला, तरी तो आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. त्यामुळे अचानक निवृत्ती जाहीर करुन धक्का बसलेल्या चाहत्यांना हा थोडासा दिलासा म्हणावा लागेल.
महेंद्र सिंह धोनीचा जन्म 7 जुलै 1981 रोजी झाला. 39 वर्षीय महेंद्रसिंह धोनीने भारतीय क्रिकेटला नवं आयाम दिलं. धोनीने भारताला पहिला टी 20 विश्वचषक, 2011 मध्ये वन डे विश्वचषक आणि भारतीय संघाला कसोटीमध्ये अव्वलस्थान असं सर्व काही मिळवून दिलं. धोनीने तीनही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाची धुरा सांभाळली.
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने अनेक सामने जिंकले आहेत. 2008 ते 2014 दरम्यान धोनी कसोटी सामन्यांचा कर्णधार होता. त्याने 2007 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत टी-20 ट्रॉफी जिंकली होती. 2010 आणि 2016 साली त्याने आशिया कप जिंकला आहे. 2011 साली त्याच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला होता. त्याचबरोबर त्यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने 2013 साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीदेखील जिंकली होती.
धोनीने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 10 हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. मर्यादित षटकांच्या फॉर्मेटमध्ये त्याला प्रभावी ‘फिनिशर’ म्हटलं जातं. त्याला सर्वोत्तम विकेट-कीपरदेखील मानलं जातं.