उस्मानाबाद जिल्हा :
उस्मानाबाद : आज प्राप्त झालेल्या 213 RTPCR अहवालांपैकी 68 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 130 अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत. 15 अहवाल इनकन्क्लूजीव आढळून आले आहेत. तसेच आज 339 Rapid Antigen Test पैकी 57 रुग्ण पॉझिटिव्ह तर 282 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.
आजपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती :
जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 5684 झाली आहे तर 3661 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 1875 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 148 वर पोहोचला आहे.
----------------------------------------------------
घराबाहेर न पडताच परीक्षा होणार; दोन दिवसात लागणार टाईमटेबल
सर्वोच्च न्यायालयाने अंतिम परीक्षा घेतल्याखेरीज पदवी देऊ नये, असा निर्णय दिल्यामुळे राज्य सरकारला परीक्षेसंदर्भात निर्णय करणं भाग पडलं. आता अंतिम परीक्षेसाठी ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. उदय सामंत यांनी याबाबत माहिती दिली. 'विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत न बोलवण्यावर राज्य सरकार ठाम आहे. आज यासंदर्भात नेमलेल्या समितीने आपला अहवाल दिला असून विद्यार्थ्यांना घराबाहेर न पडता परीक्षा घ्यायची यावर सर्व कुलगुरूंचं एकमत झालं आहे', अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली परीक्षेचा निर्णय घेणारी एक समिती राज्य सरकारने गठित केली होती. या समितीने अहवाल तयार केला आहे. त्यांच्याशी बैठक घेऊन परिक्षा कशी घ्यायची हे ठरवलं जाईल, असं सामंत म्हणाले. 'कुलगुरूंनी आणखी एक दिवस नियोजनासाठी मागितला आहे. त्यामुळे परवा संध्याकाळी ४ वाजता अंतीम निर्णय आम्ही मुख्यमंत्र्यांकडे देणार आहोत', असं ते म्हणाले.
राज्यातल्या 7 लाख 92 हजार 385 विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची आहे. विद्यार्थ्यांना घराबाहेर पडून केंद्रांवर परीक्षा द्यायला जावं लागू नये यासाठी सुरक्षित आणि सोपा पर्याय निवडत आहोत, असं उच्च शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं.राज्यातील बहुतांश विद्यापीठांनी 31 ऑक्टोबरपर्यंत परीक्षा घेण्याची सूचना केली आहे. तर काही विद्यापीठांनी 10 नोव्हेंबरपर्यंत परीक्षा घेण्याची सूचना केली. आता बुधवारपर्यंत याविषयी अंतिम निर्णय घेण्यात येईल.
कशी असेल परीक्षा? काय म्हणाले मंत्री?
- कुलगुरूंच्या अध्यक्षतेखालच्या समितीने परीक्षेसंदर्भात सूचना शासनाला कळवल्या.
- एकूण 7,92,385 विद्यार्थ्यांची परीक्षा विद्यापीठांना घ्यायची आहे.
- पूर्ण सप्टेंबर महिना विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी देण्यात येईल.
- परीक्षा कमी मार्कांची असेल, म्हणजे विद्यार्थ्यांवर ताण येणार नाही.
- विध्यार्थी घराबाहेर पडून परीक्षा देणार नाहीत यावर आम्ही ठाम.
- ऑनलाईन परिक्षे मध्येही अनेक प्रकार आहेत. MCQ, OMR किंवा असाईनमेंट पद्धतीमधून परीक्षा घेता येईल याचा विचार होईल.
- ऑक्टोबर महिन्यात पहिल्या आठवड्यात परीक्षेचा निर्णय होऊ शकतो.
- मुंबई युनिव्हर्सिटीने 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढीची UGC कडे मागणी करावी अशी विनंती केली आहे.
- यशवंतराव मुक्त विध्यापीठाने आणि अमरावतीने 10 नोव्हेंबरपर्यंत परीक्षेसाठी मुदत मागितली आहे.
- दोन दिवसात आपत्कालीन व्यवस्थापनाची बैठक लावून UGCकडे मागणी करणार आहोत.
- विध्यार्थ्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास होणार नाही याची काळजी घेऊ.
- काही कुलगुरूंनी सूचनांसाठी अजून एक दिवस मागितला आहे.
- परीक्षा आणि निकालाची तारीख, एटीकेटीचं काय यासंदर्भात निर्णय घेऊ.
- विध्यार्थ्यांना घराबाहेर न पडता परीक्षा घ्यायची यावर सर्व कुलगुरूंचे एकमत झाले आहे.
----------------------------------------------------
‘भारत रत्न’ काळाच्या पडद्या आड, प्रणव मुखर्जी यांचे निधन.
नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे दिग्गज नेते प्रणव मुखर्जी यांचे आज निधन झाले. पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी प्रणव मुखर्जी यांच्या निधनाची दु:खद बातमी दिली. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
प्रणव मुखर्जी यांची प्रकृती कालपासून अधिकच ढासळली होती. फुफ्फुसातील संसर्गामुळे ते सेप्टिक शॉकमध्ये असल्याचे आज सकाळी लष्करी रुग्णालयाने सांगितले होते. संकटमोचक हरपल्याची राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रणव मुखर्जी यांची कोरोना चाचणी 10 ऑगस्टला पॉझिटिव्ह आली होती. लष्कराच्या रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर झालेली ब्रेन सर्जरी यशस्वी ठरल्याची माहिती आहे. मेंदूतील रक्तगाठ काढण्यासाठी ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
त्यानंतर त्यांच्या तब्ब्येत खालावत गेली. त्यांना काही काळ व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. तज्ज्ञ डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून होती. पण त्यांनी उपचारांना प्रतिसाद दिला नाही. दिल्लीतील लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
‘माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. गेल्या आठवड्याभरात ज्या व्यक्ती माझ्या संपर्कात आल्या होत्या, त्या सर्वांना कोरोना चाचणी करुन आयसोलेट करण्याची विनंती करतो’ असं ट्वीट प्रणव मुखर्जी यांनी केलं होतं.
प्रणव मुखर्जींचा अल्पपरिचय
प्रणव मुखर्जी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत.
मुखर्जी यांनी 2012 ते 2017 या कालावधीत भारताचे 13 वे राष्ट्रपती म्हणून काम पाहिले.
राष्ट्रपतीपद भूषवण्याआधी 2009 ते 2012 या काळात मनमोहन सिंह सरकारमध्ये त्यांच्याकडे केंद्रीय अर्थमंत्रीपदाची धुरा होती.
इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात 1969 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर ‘प्रणवदा’ यांची राज्यसभेवर त्यांची नियुक्ती झाली आणि त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 2019 मध्ये प्रणव मुखर्जी यांना ‘भारत रत्न’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आले आहे.
-----------------------------------------------------------