उस्मानाबाद जिल्हा :
उस्मानाबाद : आज प्राप्त झालेल्या 113 RTPCR अहवालांपैकी 35 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 55 अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत. 23 अहवाल इनकन्क्लूजीव आढळून आले आहेत. तसेच आज 239 Rapid Antigen Test पैकी 43 रुग्ण पॉझिटिव्ह तर 196 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.
आजपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती :
जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 5187 झाली आहे तर 3225 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 1829 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 133 वर पोहोचला आहे.
-------------------------------------------
अजित पवार, धनंजय मुंडे, जयंत पाटील यांना पोलिसांची नोटीस, न्यायालयात हजर राहावं लागणार
अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे, कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे, शिवसेनेचे मुंबईतील नेते सचिन अहिर यांच्यासह 11 जणांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी नोटीस बजावली आहे.या नेत्यांनी 2018 मध्ये पोलिसांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मरीन ड्राईव्ह पोलिसांनी या सर्वांना न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.
या नेत्यांनी मंत्रालयासमोर तत्कालीन सरकारविरोधात आंदोलन केलं होतं. सदर प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणार आहेत.
अजित पवार आणि अन्य नेत्यांविरोधातील दोषारोपपत्राची प्रत शिवडी न्यायालयातून घेऊन जाण्यासाठी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी 31 ऑगस्ट रोजी कामकाजाच्या वेळी या सर्वांना न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.
दरम्यान, सध्याच्या सरकारमधील वजनदार नेत्यांनाच पोलिसांची नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तत्कालीन सरकारविरोधातच आंदोलन केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली असली तरीही राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना न्यायालयात उपस्थित राहावं लागणार आहे.
-------------------------------------------
" बबड्याच्या हट्टापायी शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा "
मुंबई : अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारच , असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे . त्यामुळे राज्य सरकारला मोठा झटका बसला आहे . कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता परीक्षा रद्द करण्याची मागणी केली जात होती . त्यासाठी युवासेनेच्या वतीनं आदित्य ठाकरेंनी याचिका दाखल केली होती . मात्र न्यायालयानं परीक्षा घेण्याचे आदेश दिल्यानं युवासेनेला धक्का बसला आहे . यावरून भाजपा आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे .
' आम्ही या निर्णयाचे धोके वारंवार सांगत होतो पण अहंकार ... ! ऐकतो कोण ? माननीय सर्वोच्च न्यायालयाने अखेर न्याय दिला ! महाराष्ट्रातील " पाडून दाखवा सरकारने " स्वतःच्या अहंकारातून स्वतःच तोंडावर पडून दाखवले !, अशा शब्दांत शेलार यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे . ' विद्यार्थी मित्र , मैत्रिणींनो खचून जाऊ नका . परिस्थितीला धैर्याने सामोरे जाऊ या . यश तुमच्या वाट्याला नक्की येईल . तुमचे भविष्य उज्वलच आहे !! , असंदेखील शेलारांनी म्हटलं आहे .
-------------------------------------------