कोरोना टेस्टींग करूनच दुकाने उघडण्यात यावीत - जिल्हाधिकारी जी. श्रीकांत
१६ ऑगस्ट पासून सर्वच क्षेत्रात नियमांसह मुभा.
लातूर : जिल्हयात सध्या अत्यंत कडक स्वरूपात लॉकडाऊन चालु आहे, हा लॉकडाऊन बंद करावा म्हणून मोठया प्रमाणात मागणी होत आहे. परंतु वाढती कोरोना रूग्णांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नसल्यामुळे पुन्हा-पुन्हा लॉकडाऊन वाढविण्यात येत असल्याने सामान्य जनता व व्यवसायिक अडचणीत सापडले होते. आज सोमवार रोजी मा. जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेऊन कांही प्रमाणात सुधारणा सुचविल्या आहेत.
व्यापार्यांनी चार दिवसात कोरोना चाचणी करून घ्यावी अशी सुचना करण्यात आली. १३,१४,१५ ऑगस्ट पर्यंत टप्याटप्याने टेस्टींग मध्ये वाढ करण्यात येणार असून प्रथम अत्यावश्यक वस्तू विक्री व सेवा देणार्या व्यक्तींनी यामध्ये सहभाग नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले. त्यासाठी शहरात विविध भागात कोरोना टेस्टींग सेंटर चालु करण्यात आले आहेत.
तसेच जिल्हयात प्रथमच मोठया प्रमाणात आणखी टेस्टींग सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचेही सांगीतले. यामुळे मृत्यूदर निश्चितच कमी होईल याची खात्री मा. जिल्हाधिकारी यांनी दिली.
१६ ऑगस्ट नंतर पॉझीटिव्ह व्यक्तीस स्वतःची व्यवस्था असल्यास घरात विलगीकरण करण्यात येणार आहे व त्यांच्या भागात कंटेनमेंट झोन केला जाणार आहे. ज्यांच्याकडे व्यवस्था नसेल त्यांना शासकीय सेवा पुरविली जाणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी उपस्थित पत्रकारांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यामध्ये एका वृत्तवाहिनीचे पत्रकार कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले.