महाराष्ट्रातील सहा नेत्यांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.
यावेळी भाजप नेते खासदार उदयनराजे भोसले यांनी इंग्रजीतून शपथ घेतली.
दिल्ली (२२ जुलै): राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांनी राज्यसभा सदनात आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. यांमध्ये भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी देखील राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. शपथेबरोबर ‘जय हिंद’, ‘जय महाराष्ट्र’, ‘जय भवानी- जय शिवाजी’, अशा घोषणा दिल्या. शपथेनंतर घोषणा दिल्याने उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजे यांना समज दिली. हे हाऊस नाही हे माझे चेंबर आहे. सदनातील नवीन लोकांना सांगतो. शपथ घेताना कोणतीही घोषणा देऊ नये, ते काहीही रेकॉर्डवर जाणार नाही. सभागृहात कोणतीही घोषणा देण्याची मुभा नाही, हे भविष्यात लक्षात असू द्या, असे व्यंकय्या नायडू यांना सांगावे लागले.
यांनीही शपथ घेतली
उदयनराजे भोसले यांच्याबरोबरच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, काँग्रेस नेते राजीव सातव, शिवसेनेच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी आणि भाजपचे भागवत कराड या महाराष्ट्रातील सहा नेत्यांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.
रामदास आठवले आणि उदयनराजेंनी इंग्रजी भाषेतून, तर शरद पवार यांनी हिंदीमधून, कराड, सातव, चतुर्वेदी यांनी मात्र मराठीतून शपथ घेतली.