राम मंदिर प्रकरणाला आता नवे वळण मिळू पाहत आहे. अयोध्येतील राम मंदिराची जागा आणि संपूर्ण परिसर हा बुद्ध मंदिराचा परिसर असून राम मंदिराच्या जागी प्राचीन बुद्ध मंदिर असल्याचा दावा भारतातील बौद्ध भिक्षुंनी केला आहे. ही जागा बुद्ध मंदिराला परत मिळावी यासाठी बौद्ध भिक्षुंनी आमरण उपोषणही सुरू केले आहे.
जमीन समतलीकरणात सापडले बौद्ध अवशेष- बौद्ध भिक्षुंचा दावा
राम मंदिराचे काम सुरू झाल्यानंतर जमीनीच्या समतली करणाचे काम सुरू करण्यात आले. त्यावेळी जमिनीतून प्राचिन मंदिराचे अवशेष सापडल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र हे सर्व अवशेष राम मंदिराचे नसून ते बुद्ध मंदिराचे आहेत, असा बौद्ध भिक्षुंचा दावा आहे. जमिनीच सापडलेले विशिष्ट प्रकारचे खांब, त्यावरील आकृत्या आणि चक्र हे बौद्ध धर्मीय मंदिरातच आढळतात असा भिक्षुंचा दावा आहे.
‘उत्खननाचे काम युनेस्कोच्या ताब्यात द्यावे’
आमरण उपोषणासाठी बसलेल्या बौद्ध भिक्षुंनी मागणी केली की, उत्खननासाठी रामजन्मभूमी क्षेत्राची जागा युनेस्कोच्या ताब्यात देण्यात यावी. या बरोबरच राम मंदिराचे बांधकाम त्वरित थांबविण्यात यावे अशी मागणी भिक्षूंनी केली. रामजन्मभूमी येथे जमीन सपाटीकरण दरम्यान सापडलेल्या प्राचीन वस्तूंनी हे सिद्ध केले की ते बौद्ध स्थळ आहे. बौद्ध लोक अयोध्येला साकेत मानतात जे प्राचीन काळी बौद्ध धर्माचे केंद्र होते, असे बौद्ध भिक्षुंचे म्हणणे आहे.
कोर्टातही करण्यात आला होता दावा
दरम्यान, रामजन्मभूमी बाबरी मशीद प्रकरण कोर्टात गेले असताना तिसरा पक्ष म्हणून बौद्धांनीही आपली याचिका दाखल करत या जागेवर दावा केला होता. मात्र, हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला. तसेच मशीदीसाठी पर्यायी जागा देण्याच्या सूचना सुप्रीम कोर्टाने केल्या होत्या.