- औरंगाबाद: करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुस्लिम बांधवांना बकरी ईद प्रतिकात्मकरित्या साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. त्याला एमआयएमचे नेते, खासदार इम्तियाज जलील यांनी आक्षेप घेतला आहे. बकरी ईदच का प्रतिकात्मक साजरी करायची? असा सवाल करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अयोध्येतील राम मंदिराचं प्रतिकात्मक भूमिपूजन करावं, अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली आहे. तर जलील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे.
इम्तियाज जलील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा सवाल केला. यावेळी त्यांनी बकरे खरेदीच्या ऑनलाइन प्रक्रियेलाही विरोध केला. श्रीमंतांकडे स्मार्ट फोन आहेत. ते लोक ऑनलाइन पद्धतीने बकऱ्यांची खरेदी विक्री करू शकतात. पण खेड्यापाड्यातील गरीब शेतकऱ्यांनी काय करायचे? शेतकऱ्यांकडे महागडे फोन नसतात. अनेक शेतकऱ्यांकडे तर साधेही फोन नाहीत, मग त्यांनी बकऱ्यांची ऑनलाइन खरेदी विक्री करावी कशी? शिवाय शेतकऱ्यांकडे एक-दोन बकरे असतात, त्यासाठी त्यांनी फोन खरेदी करायचे का? असा सवाल करतानाच शासनाची बकरे खरेदीची ऑनलाइन प्रक्रिया अमान्य असल्याचं जलील म्हणाले.
सरकारने बकरी ईद साध्या पद्धतीने आणि प्रतिकात्मक साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. बकरी ईद प्रतिकात्मक साजरी करायची आहे तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ५ ऑगस्ट रोजी होणारं राम मंदिराचं भूमिपूजन प्रतिकात्मकरित्या साजरं करावं, सर्व नियम आम्हालाच का? असा सवालही त्यांनी केला आहे. जलील यांच्या या वक्तव्याला विश्व हिंदू परिषदेने जोरदार आक्षेप घेतला आहे. जलील यांचं विधान सामाजिक तेढ निर्माण करणारं आणि बेजबाबदारपणाचं आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विहिंपने केली आहे. त्यामुळे बकरी ईदच्या मुद्द्यावरून एमआयएम आणि विहिंपमध्ये जुंपण्याची शक्यता आहे.