लातूर - येथील अंबाजोगाई रोडवरील अल्फा सुपरस्पेशालिटी हाॅस्पिटलचे डॉ. दिनेश वर्मा यांच्यावर आज सकाळी खुनी हल्ला करण्यात आला. याची सविस्तर माहिती अशी, उदगीर येथील ६० वर्षीय महिलेला धाप लागत असल्याने उपचारासाठी लातूर येथील अल्फा सुपर स्पेशालिटी या दवाखान्यात तीन दिवसापूर्वी दाखल करण्यात आले होते.
त्या महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता दरम्यान उपचार सुरू असताना या महिलेचा काल रात्री मृत्यू झाला. याबाबत राग अनावर झाल्यामुळे रूग्णाचा मुलगा नटवरलाल हिरालाल सकट याने डॉ. दिनेश वर्मा यांच्यावर लिफ्टमधून खाली येत असताना हल्ला केला. डॉक्टर दिनेश वर्मा यांच्या गळयावर, छातीवर व हातावर धारदार शस्त्राने वार केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले.
याबाबत शिवाजीनगर पोलीस स्टेशमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीस अटक करण्यात आली. मा. जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, महापौर यांनी घटनास्थळी भेट घेवून झालेल्या प्रकाराची चौकशी करून कार्यवाहीचे आदेश दिले असल्याचे समजते. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाणे पुढील तपास करत आहे.