लातूर : आपले प्राण पणाला लावून अतिशय उत्कृष्टरितीने अविरतपणे मानव सेवा करणार्या डॉक्टरांचा सन्मान करण्याचा दिवस म्हणजे 01 जुलै. माणसातली माणूसकी वेचून आयुष्य वाचणार्या या डॉक्टरांचा सन्मान करण्याचा यावर्षी आजचा हा दिवस खासच आहे. कारण 2020 या वर्षी कोरोनामुळे सगळे जगच महासंकटात अडकलेले असताना कोरोना योद्यांच्या प्रमुख भूमिकेत असलेल्या डॉक्टरांनी खुप मोठे योगदान दिले असल्याचे विचार रयत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रामदास काळे यांनी व्यक्त केले.
देशासह महाराष्ट्र व लातूर शहरात कोरोना प्रकोपाने समाजातील सर्व घटकांना मोठा फटका बसला आहे. तरी परंतू लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकिय विज्ञान संस्थेत सर्वांचे आयुष्य वाचवण्यासाठी मोलाचे समर्पण देत समाजसेवा करणार्या डॉक्टरांना प्रोत्साहन देण्यासाठी लातूर येथील रयत प्रतिष्ठान या संस्थेकडून शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. एरवी रुग्णाच्या जीवनाला नवजीवन देऊन पुनःरुजिवन देणार्या पृथ्वीवरील या देवाला सन्मानित करणे हा केवळ त्यांना प्रोत्साहित करुन त्यांच्या कार्यकुशलतेला गती देण्याचा आमचा प्रयत्न असतो असे मत लातूर कपडा बँकेचे सचिव सुनिलकुमार डोपे सर यांनी मांडले.
‘डॉक्टर्स डे’ निमित्त विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या कोरोना कक्षात कार्यरत असलेल्या सर्व डॉक्टर्सच्या टीमचा तसेच लातूर कॅन्सर केअर व सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल येथील डॉक्टरांचा सन्मान यावेळी करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने डॉ. गिरीश ठाकूर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था,लातूरचे अधिष्ठाता, वैद्यकीय अधिक्षक, डॉ. संतोषकुमार डोपे, उपअधिष्ठाता डॉ.मंगेश सेलुकर, उपअधिष्ठाता डॉ.उमेश लाड, विभागप्रमुख औषध वैद्यकशास्त्र डॉ.निलीमा देशपांडे, विभाग प्रमुख, बालरोग विभाग डॉ. शिवप्रसाद मुंदडा, कोरोना विलगीकरण कक्षप्रमुख डॉ. मारुती कराळे, विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा प्रमुख, डॉ.विजय चिंचोलकर, कॅन्सर व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल,लातूरचे संचालक डॉ.अजय पुनपाळे, डॉ.वर्षा पुनपाळे, संचालक आणि डॉ.सोनाली गायसमुद्रे इत्यादी डॉक्टरांचा ट्रॉफी सन्मानपत्र शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी रयत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रामदास काळे, लातूर कपडा बँकेचे सचिव व रयत प्रतिष्ठानचे मार्गदर्शक सुनिलकुमार डोपे सर, रयत प्रतिष्ठानचे सचिव नेताजी रणखांब, रयत प्रतिष्ठानचे कोष्याध्यक्ष संतोष यादव, रयत प्रतिष्ठानचे सदस्य अमोल जोशी सर यांची उपस्थिती होती.