करमाड ( ता . औरंगाबाद ) शेंद्रा एमआयडीसीच्या नवीन उड्डाणपुलाजवळ शुक्रवारी पहाटे हा भीषण अपघात झाला . देशभर कोरोनामुळे लॉकडाऊन आहे . यात अनेक मजूर अडकले असून आता सरकारने सर्वांना आपल्या गावी परतण्याची परवानगी दिली आहे . जवळ असलेली जमा पुंजी लॉकडाऊनमध्ये संपली . आता खायला आणि गावी जायलाही पैसे नसल्याने अनेक मजूर कुटुंबियांसह पायी प्रवास करीत आहेत . रेल्वेने सरळ रस्ता आहे , असे समजून १९ मजूर रुळावरून पायी चालत होते . चालून चालून थकल्यामुळे ते करमाडजवळ रुळावर झोपी गेले . पहाटे गाढ झोपेत असताना मालवाहू रेल्वे आली . मजुरांना झोपेत काहीही समजले नाही . रेल्वेने त्यांना चिरडल्यानंतर एकच आक्रोश झाला . घटनेची माहिती मिळाल्यावर रेल्वे पोलिस , रेल्वे सुरक्षा बल , ग्रामीण पोलिस अधिकारी , पोलिस निरीक्षक व कर्मचारी घटनास्थळकडे रवाना झाले आहेत .
लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना गावाची ओढ लागली आहे . मिळेल त्या वाहनाने आणि दिसेल त्या रस्त्याने हे मजूर रस्ता कापित आहेत . रेल्वे रुळावरून चालत जाताना थकल्यावर ' आता कुठं रेल्वे सुरू आहे ' म्हणून रुळावरच अंग टाकलेल्या मजुरांना झोपेतच मालवाहू रेल्वेने चिरडले . यात १६ मजूर चिरडल्याने जागीच ठार झाले , सुदैवाने तिघांचा जीव वाचला .
मालवाहू रेल्वेने चिरडल्याने १६ मजूर जागीच ठार