लातूर/ प्रतिनिधी : मागच्या 45- 50 दिवसांपासून लॉकडाऊनच्या परिस्थिीत सुध्दा समाजाची अविरत सेवा करुन समाजाला कोरोनापासून दूर ठेवण्याचे काम सफाई कामगार आणि कोरोनावॉरिअर्स कडून अविरतपणे केले जात आहे. त्यांच्या या कार्याची कृतज्ञता व्यक्त करुन या यंत्रणांचा सन्मान करत त्यांना प्रोत्साहित करण्याचे सत्कर्म लातूर येथील प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाद्वारा सफाई कामगारांना धान्य वाटप करण्यात आले. त्याशिवाय सोशियल डिस्टन्सींगचे पालन करत कोरोना वॉरिअर्सचा सन्मान करण्यात आला.
कोरोनाच्या लढाईत महत्वाची भूमिका बजावणार्या सफाई कामगार, निराधार व गरजूंना जवळपास 12 क्विंटल धान्याचे व जिवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. तसेच त्यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना त्यांच्या प्रोत्साहनपर कार्यासाठी ईश्वरीय सकारात्मक उर्जेची जाणिव करुन दिली. सविस्तर वृत्त असे की, जगात कोरोनाने हाहाकार माजवल्यामुळे धावपळीच्या आणि भौतिक सुखाच्या मागे धावणार्या माणूसकी हरवलेल्या माणसाला एकत्र येण्याची जाणिवच जणू या संकटाने करुन दिली आहे. अशा परिस्थितीत कोरानाच्या संक्रमणापासून आम जनतेची रक्षा करणारे कोरोना वॉरिअर्स आणि सफाई कामगार यांचा सन्मान करत सफाई कामगारांना जवळपास 12 क्विंटल धान्य व काही जिवनावश्यक वस्तूंचे प्रजापिता ब्रम्हकुमारीज सेवा केंद्राच्या वतीने सोशियल डिस्टन्सींगचे पालन करत डॉ. गितांजली पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी लातूर येथील ब्रम्हकुमारीज सेवा केंद्राच्या डॉ. गितांजली पाटील, प्रभाग क्रमांक.17 च्या नगरसेविका शोभाताई पाटील, ब्रम्हकुमारीज सेवा केंद्राच्या संचालिका ब्र. कु. नंदा दीदी, ब्र. कु. पुण्या दीदी आणि प्रिंट मिडीयाचे पत्रकार आदींची उपस्थिती होती.
त्याशिवाय कोरोना वॉरिअर्समध्ये सर्वात महत्वाची भूमिका निभावणार्या डॉक्टर्स, नर्सेस व लातूर शहरातील पोलीस यांना ईश्वरीय ग्रंथ व ईश्वरीय प्रसाद देवुन सन्मान करून समाजातील प्रत्येक घटकांच्या वतीने त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.