मुंबई | देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या दृष्टीने ही अतिशय चिंताजनक बाब आहे. राज्य सरकार कोरोनाला पिटाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. अनेक लोकंही मदतीचा हात पुढे करत आहेत. मात्र असं असताना विरोधी पक्षात असलेला भारतीय जनता पक्ष मात्र पंतप्रधान सहाय्यता निधीला मदत द्या, असं आवाहन करत आहे. याचमुळे लोकांनी भाजपवर टीका करायला सुरूवात केली आहे. महाराष्ट्र भाजपने केलेलं एक ट्विट चांगलंच ट्रोल झालं आहे.
कोरोनाविरुद्ध लढूया…एकजुटीने ! यथाशक्ती योगदान देऊया, देशाला बळकट करूया !, असं कॅप्शन वापरत महाराष्ट्र भाजपने पंतप्रधान केअर फंडात मदत द्या, असं आवाहन जनतेला केलं होतं. त्यासोबत पंतप्रधान केअर फंडाचा अकाऊंट नंबर तसंच इतर गरजेच्या गोष्टींचा तपशील दिला होता. मात्र हेच ट्विट नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असल्याचं चित्र आहे. अनेक लोकांनी तोंडसुख घेत महाराष्ट्रावर एवढं मोठं संकट असताना केंद्राला मदत करा, असं आवाहन करायला भाजपला लाज कशी वाटत नाही, अशी जोरदार टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री मदत निधी हसतमुखाने घ्यायचे. आज पद नाहीतर प्रधानमंत्री फंडात पैसे द्यायला सांगत आहे. आपले राज्य संकटात सापडलेले असताना राज्यातील विरोधी पक्षनेते असा संकुचित विचार करतील असे कधी वाटले नव्हते, अशी नाराजी एका नेटकऱ्याने व्यक्त केली आहे. तर सत्तेत नाही म्हणून भाजप महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांच्या सहाय्यता निधीला मदत करण्याचं आवाहन करत नाही, अशी टीका एका नेटकऱ्याने केली आहे.
दरम्यान, आम्ही सत्तेत असताना कोल्हापूर-सांगलीला महापूर आला होता तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांच्या त्यांच्या परीने मदत केली होती. तेव्हा कोणताही निधी त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला नव्हता, असं स्पष्टीकरण आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर दिलं आहे.
दुसरीकडे राज्यात कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा वाढत चाललेला आहे. आज राज्यात 33 कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण कोरोना बाधितांची संख्या 335 वर जाऊन पोहचली आहे. नवीन रुग्णांमध्ये मुंबईचे ३०, पुण्याचे २ आणि बुलढाणा येथील एका रुग्णाचा समावेश आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे