मुंबई - सध्या संपूर्ण जगभरासह भारतात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भीषण वातावरण आहे. प्रत्येक दिवशी देशातील महत्वाच्या शहरांमध्ये कोरोना बाधित रुग्ण सापडत आहेत. अशातच बीसीसीआयचे काही अधिकारी यंदाच्या हंगामातील आयपीएल स्पर्धा रद्द होणार नाही असं सांगत असले तरीही बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने सध्याच्या घडीला आयपीएल स्पर्धा खेळवणं शक्य नसल्याचे सूचक संकेत दिले आहेत. एका वृत्तसमुहाशी बोलताना ही माहिती दिली आहे.
सध्याच्या घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, पण आता सांगण्यासारखं काहीच नाही आणि सांगण्यासारखं आहे तरी काय?? विमानतळं बंद आहेत, लोकं घरात अडकली आहेत, ऑफिस बंद आहेत, कोणीही कुठेही जाऊ शकत नाही. तुम्ही खेळाडूंना कुठून आणणार? ते प्रवास कसा करतील?, सध्या जगभरात कोणतीही क्रीडा स्पर्धा खेळवली जाईल अशी परिस्थिती नाही, असं म्हणत गांगुलीचे सूचक संकेत दिले आहेत.
सोमवारी मी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांसोबत बोलल्यानंतर तुम्हाला अधिक माहिती देऊ शकेन. पण अगदी मनापासून सांगायला गेलं तर सध्या संपूर्ण जग ठप्प झालेलं आहे, अशा परिस्थितीत खेळाचं भविष्य काय असेल हा प्रश्नच असल्याचं गांगुलीने म्हटलं आहे.
दरम्यान, प्रत्येक दिवशी देशभरात करोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत असून आतापर्यंत 200 हून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.