"मी भारताच्या पंतप्रधानांशी बोललो आहे. आमच्यात चांगली चर्चा झाली. त्यांनी आम्हाला मलेरियावर परिणामकारक ठरणारं औषध पाठवलं तर चांगलं होईल. पण त्यांनी तसं नाही केलं तर साहजिकच अमेरिकेकडून प्रत्युत्तरादाखल कारवाई केली जाईल." अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत हे विधान केलं.
अमेरिकेने भारताकडे हाइड्रॉक्सीक्लोरिक्वीन या औषधाची मागणी केली आहे. या मागणीवर भारत सरकारच्या मंत्रीगटाच्या आज होत असलेल्या बैठकीत विचार आणि निर्णय होऊ शकतो. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या मंत्रीगटाचे अध्यक्ष आहेत. या बैठकीपूर्वी परराष्ट्रमंत्रालयाने असं म्हटलंय की, 'भारतावर अवलंबून असणाऱ्या भारताच्या शेजारी देशांना पॅरासिटामॉल आणि हाइड्रॉक्सीक्लोरिक्वीन या औषधांचा 'योग्य त्या प्रमाणात' पुरवठा केला जाईल.' वृत्तसंस्थांनी दिलेल्या बातमीनुसार परराष्ट्रमंत्रालयाने 'कोव्हिड19 चा फटका बसलेल्या इतरही काही देशांना या औषधांचा पुरवठा केला जाईल.'
4 एप्रिलच्या सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती देशवासीयांना दिली. मात्र कोरोनाविरुद्धच्या लढाईत अमेरिकेला भारताकडून नेमकी काय मदत हवी आहे, याचा तपशील त्यांनी दिला नाही. याबाबात माहिती ट्रंप यांनी अमेरिकेतील प्रसारमाध्यमांना दिली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर बोलताना ट्रंप म्हणाले, “माझं मोदींशी बोलणं झालं. भारतात मोठ्या प्रमाणावर हाइड्रॉक्सीक्लोरिक्वीनची निर्मिती होते. मात्र तूर्तास भारताने या औषधावर बंदी घातली आहे. भारतात या औषधाला प्रचंड मागणी आहे. त्यांची लोकसंख्याही जास्त आहे. मात्र अमेरिकेतर्फे आम्ही औषधाची मागणी केली आहे. आमच्या मागणीसंदर्भात विचार करू असं भारताने म्हटलं आहे."
कोरोना विषाणूवर अद्यापतरी कोणतीही लस उपलब्ध झालेली नाही. अमेरिकेत हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा वापर कोरोनाग्रस्तांच्या उपचारांसाठी केला जात आहे. जगात सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण अमेरिकेत आहेत.
आकडेवारीनुसार, मंगळवार सकाळपर्यंत अमेरिकेत 3 लाख 68 हजार कोरोनाबाधित आहेत. तिथे आतापर्यंत कोरोनामुळे 10,986 लोकांचा मृत्यू झाला आहे.