मुंबई | महाराष्ट्रातील ज्या भागात कोरोनाचे रुग्ण नाहीत त्याभागातील जनजीवन सुरळीत करण्याच्या दिशेने लवकरच पाऊल पडेल, असं राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. मंत्रिमंडळ उपसमितीने विचार केल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या संमतीने लवकरच निर्णय होईल, असं ते म्हणाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन केल्याने जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं आहे. उद्योगधंदे बंद असून छोट्या मोठ्या व्यावसायिकांनाही याचा मोठा फटका बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळले नाहीत त्या भागातील जनजीवन सुरळीत करण्याच्या दिशेने पावलं टाकण्याचा विचार मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत चर्चिला गेला होता.
राज्यातील पुणे-मुंबईसह काही शहरांमध्ये कोरोनाचा चांगलाच प्रादुर्भाव आहे, मात्र काही असेही जिल्हे आहेत जिथं कोरोनाचे रुग्ण अद्याप आढळले नाहीत. राज्य सरकारचा हा निर्णय या भागासाठी वरदान ठरु शकतो.
दरम्यान, सांगली-कोल्हापूर या भागात गेले काही दिवस कोविड 19 चा कोणताही नवीन रुग्ण नसल्याने, या भागातील उद्योग सुरू व्हावेत, अशी मागणी या भागातील विविध उद्योजकांच्या संघटना करत होत्या. याबाबत सरकारच्या पातळीवर लवकरच निर्णय होईल, अशी आशा आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.