लातूर दि. ०२ :- लातूर येथील "आज लातूर डॉट कॉम" या पहिल्या वेब पोर्टल न्यूज चॅनलचे संस्थापक संपादक रवींद्र जगताप यांचे आज दि. 2 एप्रिल 2020 रोजी सायंकाळी त्यांच्या गावभागातील माळे गल्ली येथील घरी निधन झाले. मृत्यूसमयी ते 56 वर्षाचे होते. मागील दीड-दोन महिन्यांपासून ते आजारी होते.
लातूर शहरातील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्राशी ते जोडले गेले होते. लातूरच्या गावभागात असताना त्यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनात नाट्य चळवळ उभी केली होती. "पडघम" या नावाने त्यांनी सामाजिक विषयावर विविध नाटके सादर केली. शिवाय दैनिक "एकमत" मध्येही त्यांनी वृत्तसंपादक म्हणून अनेक वर्षे काम केले. "सहारा समय" या राष्ट्रीय हिंदी चँनलसाठी साठी त्यांनी लातूर जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून काम पाहिले. शिवाय नेटवाणी, संवाद - एस एम एस न्यूज सेवा अशा विविध नवनव्या माध्यमांची सुरुवात त्यांनी लातूर येथे केली.
त्यांनी 15 वर्षांपूर्वी काढलेल्या "आज लातूर" या त्यांच्या वेब न्यूज चॅनलला खुप लोकप्रियता मिळाली. त्याचे देशात आणि विदेशात सबस्क्रायबर निर्माण झाले. त्यांना असणारा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव आणि नाविन्याची आवड यामुळे त्यांचे वेब चॅनल खूप लोकप्रिय ठरले होते. लातुरातील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रासह राजकीय क्षेत्राची इत्यंभूत माहिती देणारे वेब चैनल म्हणून लातुरातील जगभर पसरलेल्या लातूरकरांनी आज लातूर या वेब न्यूजला पसंती दिली होती. राज्य शासनाच्या माहिती विभागाच्या विभागीय अधिस्वीकृती समितीवर सदस्य म्हणून ही त्यांनी दोन वर्षे काम पाहिले. ते जिल्ह्यातील पत्रकारामध्ये लोकप्रिय होते. या क्षेत्रात येव पाहणार्या नव्या मुलांनी या नवीन तंत्रज्ञानाशी जोडून घेऊन सोशल मीडिया मध्ये काम करावे यामध्ये भरपूर संधी असल्याचे ते वारंवार सांगत.
रवींद्र जगताप यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ असा मोठा परिवार आहे. रविंद्र जगताप यांच्या दुःखात लातूरचे सर्व पत्रकार सहभागी आहेत.