मुंबई | मोदी सरकारने दिलेले मोफत धान्य तुम्हाला वाटायला अडचण काय ? असा सवाल करत , गोरगरिबांचा भूकबळी जाण्याचा सरकार वाट पाहतंय का ? ,अशी टीका भाजपचे आमदार राम कदम यांनी केली आहे.
मोदी द्वेषापोटी मोदी सरकारने दिलेले मोफत धान्य अजून पर्यंत महाराष्ट्र सरकार गोरगरिबांना वाटायला तयार नाही. महाराष्ट्र सरकार काय भूकबळीची वाट पाहतंय का ? मोदी द्वेषापोटी तुम्ही दिवे लावणार नाही आम्ही समजू शकतो. मात्र मोदी सरकारने दिलेले मोफत धान्य वाटायलाच पाहिजे, असं राम कदम यांनी म्हटलं आहे.
मोफत धान्य कधी देणार हे सरकारला विचारलं तर 15 एप्रिल नंतर देणार, असं सरकारने सांगितलं आहे. पण तोपर्यंत काय बोंबा मारायच्या का ? रेशन कार्ड असेल नसेल सरसकट प्रत्येकाला मोफत धान्य महाराष्ट्र सरकारने दिलेच पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे, असं राम कदम म्हणाले आहेत.
दरम्यान, ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही त्यांचे आधारकार्ड प्रमाण मानून आणि ज्यांच्याकडे आधारकार्डसुद्धा नाही, अशांची यादी तयार करून ती तहसीलदारांकडून प्रमाणित करून त्यांनाही धान्य द्या, अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.