मुंबई | राज्य शासनाने आवाहन केल्यानंतर अनेक खाजगी डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने, हॉस्पिटल सुरु केले आहेत. परंतु ज्यांनी त्यांचे दवाखाने अजूनही सुरु केलेले नाहीत त्यांची नोंद शासनाने आणि स्थानिक नागरिकांनी घेतली असून या डॉक्टरांवर निश्चितच कारवाई करणार असल्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
कोरोनापासून बचावासाठी ‘होम क्वारंटाईन्’ आणि ‘हॉस्पिटल क्वारंटाईन्’ हे दोनच पर्याय सध्या तरी उपलब्ध आहेत. कोरोना संसर्गानं हॉस्पिटल क्वारंटाईन होण्यापेक्षा नागरिकांनी स्वेच्छेनं होम क्वारंटाईन व्हावं. तसंच स्वत:चं आणि कुटुंबाचं संरक्षण करावं, असा सल्ला अजित पवार यांनी दिला आहे.
कोरोना बाबत काहींच्या बेजबाबदारपणामुळे रुग्णसंख्या वाढतेय. भाजी बाजारातल्या गर्दीमुळे ‘कोरोना’ तुमच्या घरात पोहचण्याचा धोका आहे. जे आज घरात थांबणार नाहीत ते काही दिवसांनी हॉस्पिटलमध्ये दिसतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
दुसरीकडे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात तब्बल 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. या लॉकडाऊच्या दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव आहे. मात्र भारताला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज आहे, असं मत केम्ब्रिज विद्यापीठातील भारतीय वंशाच्या दोन संशोधकांनी व्यक्त केलं आहे.