मुंबई | राज्यात कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा वाढत चाललेला आहे. आज राज्यात 33 कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण कोरोना बाधितांची संख्या 335 वर जाऊन पोहचली आहे.
नवीन रुग्णांमध्ये मुंबईचे ३०, पुण्याचे २ आणि बुलढाणा येथील एका रुग्णाचा समावेश आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. तर कोरोनाबाधितांपैकी आज तीन रूग्णांचे देखील मृत्यू झाले आहेत. यामध्ये दोन मृत्यू मुंबईत तर एक व्यक्तीचा मृत्यू पालघर या ठिकाणी झाला आहे. या तिन्ही रुग्णांनी कोठेही परदेशी प्रवास केल्याचा इतिहास नाही, असं सांगत आतापर्यंत राज्यात १३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.
कोरोनाबाधितांमध्ये मुंबईचे १८१, पुणे ५०, ठाणे ३६, सांगली २५, नागपूर १६, अहमदनगर ८, यवतमाळ ४, बुलढाणा ४, सातारा व कोल्हापूर प्रत्येकी २, औरंगाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, जळगाव, नाशिक, गुजरात प्रत्येकी १ यांचा समावेश आहे, अशी माहिचीही टोपे यांनी दिली आहे.
दुसरीकडे राज्यात आज ७०५ जण विविध रुग्णालयांत भरती झालेले आहेत. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांपैकी ७१२६ जणांची विलगीकरण कक्षात भरती झालेले आहेत. त्यापैकी ६४५६ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना व्हायरसकरिता निगेटिव्ह आलेले आहेत. कोरोना व्हायरसने बाधित असलेले ४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.