लातूर- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आता जिल्हाधिकारी जी . श्रीकांत यांनी कठोर पावले उचलली आहेत. जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या तरीही अनधिकृतपणे प्रवेश करणार्यांचे प्रमाण अजूनही कमी झाले नाही. त्यामुळे आता लातूर जिल्ह्यात अनधिकृतपणे प्रवेश करणाऱ्यांना २००० रुपये दंड आकारला जाणार आहे.
राज्यात लाॅकडाऊन लागू केल्यापासूनच साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली होती, त्यानुसार लातूर जिल्ह्याचाही सर्व सीमा बंद करण्यात आल्या होत्या. लातूर जिल्ह्यात मागे आठ कोरोना बाधित आढळले होते त्यानंतर कालच आणखीन एक कोरोना ग्रस्त महिला आढळली आणि त्या महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी आता आपत्ती निवारण विषयक नियमांचे कठोर अंमल करण्याचे आदेश दिले आहेत अनधिकृतपणे जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांवर पोलीस गुन्हा दाखल करणार आहेत तसेच दोन हजार रुपये दंडही वसूल केला जाणार आहे आणि त्यांना 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे.