लातूर - जिल्हा कोविड 19 पासून सुरक्षित ठेवण्यासाठी जे जे करणे शक्य आहे त्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. हे करीत असतानाच आगामी काळात सर्व उद्योग, व्यवसाय आणि इतर सर्व कामकाज सुरळीत सुरू होऊन जिल्ह्याची एकूण परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचेही नियोजन करण्यात येत आहे अशी माहिती बुधवार दि. २९ एप्रिल रोजी सकाळी लातूर जिल्ह्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधत असताना जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी प्रसंगी दिली.
कोविड १९ पासून जिल्हा सुखरूप ठेवण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना व लॉकडाऊन २ मध्ये दिलेल्या शिथीलतेनुसार जिल्हयाला पूर्वपदावर आणण्यासाठी करण्यात येत असलेल्या नियोजनाची माहिती दिली. लातूर जिल्ह्यातील सर्वच नागरिक सुजान आहेत. लॉकडाऊन १ मधील प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे येथील जनतेने तंतोतंत पालन केले. त्यामुळे इतर जिल्ह्याच्या तुलनेत लातूर सुखरूप राहिले आहे.