मुंबई | राज्यातील जवळपास 19 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी त्यांच्या खात्यावर जमा झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. 31 मार्चअखेर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 11 हजार 966 कोटी 21 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. याचा राज्यातील थेट 18 लाख 89 हजार 528 शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकासआघाडीने राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर नव्याने कर्जमाफीची घोषणा केली होती. त्याचीच अंमलबजावणी सध्या होत आहे.
जिल्हा सहकारी बँकांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत 10 लाख 40 हजार 935 शेतकऱ्यांच्या खात्यात 5 हजार 407 कोटी 13 लाख रुपये जमा करण्यात आले. तसेच व्यापारी बँकांच्या माध्यमातून 8 लाख 48 हजार 593 शेतकऱ्यांच्या खात्यात 6 हजार 559 कोटी 80 हजार रुपये जमा करण्यात आलं आहेत. जगभरात कोरोना संसर्गाने थैमान घातलं आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतातही खबरदारी म्हणून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. मात्र याचा थेट परिणाम राज्यातील शेतकऱ्यांवरही झाला आहे.