नवी दिल्ली | कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना प्रथमच विश्वासात घेत त्यांच्याबरोबर बैठक घेतली. या बैठकीत देशातला 14 एप्रिलला संपणारा लॉकडाऊन पूर्णपणे शिथील करणार नसल्याचे संकेत पंतप्रधान मोदींनी दिले आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी देशातल्या विरोधी पक्षातल्या प्रमुख नेत्यांसोबत व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी केंद्राने काय पावलं उचलली पाहिजेत किंवा कोणकोणत्या उपापययोजना करायला पाहिजेत यासह विरोधी पक्षाच्या सूचना त्यांनी ऐकून घेतल्या.
सद्य परिस्थितीला राष्ट्रीय आपत्ती म्हणत आताच्या काळात सोशल डिस्टन्सिंग हा एकच पर्याय खूप चांगला आहे. आणि हा पर्याय आपल्याला यातून लवकरात लवकर बाहेर काढू शकतो. त्यामुळे लॉकडाऊन लगेच शिथील करणं धोकादायक असेल, असं मोदी बैठकीत म्हणाले. याउलट लॉकडाऊनच्या कार्यकाळात वाढ करून या रोगावर विजय मिळवण्याचं केंद्राने ठरवलं आहे, याचे संकेत मोदींनी कालच्या बैठकीत दिले आहे.
दरम्यान, मी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलतोय. तसंच कलेक्टर आणि पोलिस प्रमुखांशी बोलतोय. या सगळ्यांचं म्हणणं आहे की लॉकडाऊन जर एकाच वेळी शिथील केला तर ते धोकादायक असू शकतं. म्हणून आपण त्यावर अधिक विचार करत आहोत, असं मोदी म्हणाले.