खऱ्या जगाचा विसर पाडायला लावणारे आभासी जग अक्षरश: हातातच, त्यामुळे समाजमाध्यमांवर व्यक्त होण्याची भाषाच बदललीय.

‘महाराष्ट्रीय तरुण’ केंद्रस्थानी ठेवायचा म्हणजे काय करायचं? कोण आहेत हे तरुण? काय करतात सध्या.. आणि ‘काहीच करत नाहीत’ तर ते कशामुळे? हे तरुण राहात असतील ग्रामीण, अर्धनागरी भागांत; पण जगताहेत मात्र ‘वायफाय’वर.. अशा तरुणाईच्या स्थिती-गतीचा ठाव घेणारं हे सदर यापुढे महाराष्ट्रभर फिरेल; त्याआधीचा हा प्रस्तावना-लेख...


‘जर या वर्षी तुझं काहीच झालं नाही तर समजून घे, तुझा जन्म फक्त जनगणनेसाठी झालाय’ एका लग्नाळू पोराला नव्या वर्षांच्या पार्श्वभूमीवर त्याच्या मित्राने पाठवलेला हा ‘एसेमेस’ आहे. अर्थात अशी लग्नाळूंची संख्या गावोगाव मुबलक आहे. रोजगार नाही, हाताला काम नाही म्हणून लग्न नाही असा हा प्रकार आहे. गावोगाव महाविद्यालयं वाढली, शिक्षणाचं प्रमाण वाढलं. ज्या पुढाऱ्यांना कुक्कुटपालन आणि शिक्षणसंस्था या दोन्हीही गोष्टी सारख्याच वाटतात अशांनी ही गंगा पार तळागाळापर्यंत नेली. यात गुणवत्तेचे मोल जोखणारेही होते; पण त्यांची संख्या अगदीच नगण्य. सर्वच क्षेत्रांतला चांगुलपणा अल्पसंख्य झाल्याचंच हे निदर्शक. नोकऱ्या वाढल्या; पण त्यापेक्षा कैक पटींनी उमेदवारांची संख्या वाढली. पात्र आणि गुणवान उमेदवारांच्या टाचा घासल्या गेल्या; पण त्यांना नोकरीची दारंच बंद झाली. संस्थाचालकांनी फक्त भावफलक लिहून ठेवले नाहीत इतकंच; पण एखादी जागा निघाल्यानंतरचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर निथळत असतो. आजही पीएच.डी., नेट-सेट केलेले गुणवंत कुठं घडय़ाळी तासिकांवर, तर कुठं छोटामोठा रोजगार मिळवण्याच्या तयारीत, काहींनी चक्क पुन्हा शेतीची वाट धरली.


याउलट गडगंज पसा देऊन धनवानांनी आपल्या पोरांना ‘चिकटवलं’. बापाची धनवत्ता हीच पोराची गुणवत्ता! साहेबांच्या मुला-मुलींच्या लग्नकार्यात वाढप्याची  कामं करण्यापासून ते निवडणुकीत प्रचारकार्यात उतरण्यापर्यंतचं लवचीकपण अंगी असणाऱ्यांकडं मग आपोआपच सुरक्षितता आली. मग त्यांनी वाङ्मयाला ‘वान्डमय’ म्हटलं तरी काही फरक पडत नाही. सध्या प्राध्यापकाच्या जागेचा रेट मराठवाडय़ात पस्तीस ते चाळीस लाखांवर जाऊन पोहोचलाय. अलिखित निविदा प्रक्रियेतूनच ही पदं भरली जातात. ज्यांची एवढा पसा देण्याची ऐपत नाही अशा पात्रता अंगी असणाऱ्यांनी मिळेल ते काम हाती घेतलंय. विनाअनुदानित नावाची एक नवीच संस्कृती उदयाला आली. आयुष्यातली उमेदीची सगळी वर्ष एखाद्या संस्थेत घासूनही कोणतीच सुरक्षितता नाही. यात आयुष्याचाच पालापाचोळा झाला. ज्यांची लग्नं झाली त्यांना पुन्हा जोडीदारासह स्वत:ला पोसणंही कठीण होऊन बसलं. नोकरीवर असल्याचं दाखवून जुळवलं खरं; पण कधी तरी कायम होण्याची आस पार करपून गेली. ‘सोंग आलं सजून अन् दिवटी गेली विझून’ असा सारा प्रकार. यात कित्येकांचं आयुष्य सडवलं- कुजवलं गेलं.


दुसरीकडं असंख्य हुशार तरुणांची अधिकारी होण्याची स्वप्नं आहेत. त्यांना स्पर्धापरीक्षांचा मार्ग दिसतोय. पोरगा काय करतोय म्हटल्यावर ‘यम्पीयस्सी’ची तयारी, असं उत्तर हमखास मिळतं. त्यासाठी या भागातनं पुण्याला जाणाऱ्यांची संख्याही मोठी. स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्र हा नवा उद्योग मोठमोठय़ा शहरांमध्ये बहरला, त्याचा कच्चा मालही खेडय़ापाडय़ांतली पोरंच. या भागातल्या एखाद्याची यशकथा क्लासेसवाल्यांसाठी मोठी जाहिरातीची संधी ठरते. पूर्वी तित्तरं पकडण्यासाठी पारध्यांकडं शिट्टी असायची. ही शिट्टी तित्तराचाच हुबेहूब आवाज काढणारी, ती वाजवली की बाकीची तित्तरं आपोआप सापळ्यात गोळा व्हायची.. तर सांगायचा मुद्दा असा की, असे सापळे वाढत चाललेत.


आणखी एक वेगळ्या प्रकारचा तरुणाईतला वर्ग आहे जो अधूनमधून निर्माण होणाऱ्या स्फोटक परिस्थितीत व्यक्त होत राहतो. ठासून भरलेली अस्वस्थता, कल्पिलेल्या प्रतिपक्षाला कायम ललकारण्याचा पवित्रा; आपल्या अस्मितांना कुरवाळत, प्रतीकांना जोजवत हा वर्ग कैक घोषणांना जन्माला घालून आपल्या जातीच्या आयुधांना धार लावत असतो. ‘गर्वच नाही तर माज आहे, मी अमुकतमुक असल्याचा’ हे अगदी सरसकट ऐकायला मिळू लागतं. कोणतीच जात याला अपवाद नाही.


असंख्य गुणवत्ताधारक हाती आलेल्या व्यवसायातून मजबुरीवर मात करीत असताना दुसरीकडं पुढाऱ्यांच्या आश्रयाने, असीम कृपावर्षांवाने फोफावणाऱ्या धंद्यातून काहींचे दिवस आमूलाग्र पालटले. जुगार अड्डय़ांपासून वाळूच्या धक्क्यापर्यंत आणि भूखंडाच्या हेराफेरीपासून सर्व प्रकारची दलालीची कामं करून अशांनी आपला असा काही उत्कर्ष साधला की, कोणत्याही पंचक्रोशीत ‘आता हाच आपला आदर्श’ असं पोरं मानायला लागली. कष्ट करून, चांगल्या मार्गानं कुठं श्रीमंत होता येतं का? कल्याण करून घ्यायचं असेल तर असंच काही तरी पाहिजे, असा दृढ निर्धार आणि ठाम धारणा बळावल्या. यात उद्यमशीलता, दीर्घ परिश्रम आणि सचोटी म्हणजे तद्दन बावळट गोष्टी हे जणू समीकरणच ठरले. त्यातच परिसरातला एखादा दिवटा ‘आमचं काळीज’ म्हणून फलकावर झळकतो आणि त्याखाली लटकलेले कित्येकांचे चेहरे. ग्रामीण महाराष्ट्रातल्या कोणत्याही गावाच्या फाटय़ावर असे फलक दिसतील. अशा तमाम तरुणाईचं ‘काळीज’ असणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ‘मित्रमंडळ’ अशा बिरुदाने नवनवे कळप आकाराला येत आहेत. अशा कळपांचा भाग झाल्यानंतर सुरुवातीला ‘बुलेट’, नंतर ‘स्कॉर्पिओ’ अशा क्रमाने पुढे जाता येतं ही दिशाही ठरून गेलीय. ‘जेसीबी’, ‘पोकलेन’, ‘टिप्पर’ हे जणू आजच्या काळाचं वाहन. यावर स्वार होऊनच ‘दादा’, ‘भया’, ‘युवराज’ वगैरे बनता येतं. अर्थात हे चटकन नजरेत भरणारं आणि गावोगाव फेसाळणारं जग आहे.


या सगळ्यांच्या पलीकडे असंख्य चेहरे आहेत. ज्यांच्या डोळ्यात स्वप्नं होती, स्वप्नांना आकार देण्याची जिद्द होती, भोवतालाला बदलण्याची आकांक्षा होती अशा सर्वाच्या जिगरबाजपणावर काजळी चढावी, त्यांच्या उमेदीचं कंपोष्ट खत व्हावं, साऱ्याच दिशा कुंठित व्हाव्यात असा हा काळ आहे. या वर्तमानात आपण सर्वस्वी अप्रस्तुत ठरलोय असंही त्यांना वाटू लागलंय. समाजमाध्यमांच्या भिंतीवर चमकदार, आवाजी, अभिनिवेशी तऱ्हेने व्यक्त होणाऱ्यांच्या पलीकडचं हे जग आहे. स्वप्न आणि वास्तवातलं अंतर कधी कमी होईल यासाठी ताटकळत बसलेल्यांचे जथेच्या जथे या जगात आहेत. कळाहीन जीवनाचा विसर पाडायला लावणारं आभासी जग मोबाइलच्या रूपाने अक्षरश: हातात आहे. हाताला काम देणारे कोणतेही मोठे प्रकल्प नाहीत, शेतीवर सगळ्यांचाच बोजा परवडत नाही, सरकारी नोकऱ्यांची दारंच बंद, कारण नोकरभरतीच नाही. खासगी नोकऱ्यांचं जग प्रचंड आक्रसून गेलंय. अशा स्थितीत करायचं काय, हाच अनुत्तरित प्रश्न अनेकांना सतावतोय.



काही भल्या गोष्टी दिसतात. चार तरुण एकत्र आलेत, त्यांनी एखादा उद्योग सुरू केलाय. गावातनं काही तरी नेऊन शहराच्या बाजारपेठेत दखलपात्र जागा निर्माण केलीय. शेतीच्या काही उत्पादनांना थेट शहरातली बाजारपेठ मिळवलीय. बाजाराची गरज ओळखून उत्पादनं घेण्याची व्यावहारिकता संपादित केलीय. असे काही नवनव्या वाटा शोधत आहेत. ज्यांना निराशेनं घेरलेलं नाही. ‘नाद केला, पण वाया नाही गेला’ असं म्हणण्याचे खरं तर हेच दावेदार; पण भलत्याच भरधाव वेगानं धावणाऱ्या बेलगाम वाहनांवर पाठीमागं अशी अक्षरं दिसतात.


शाळा-महाविद्यालयांच्या कारखान्यांमधून बाहेर पडलेले लोंढे सुविहितपणे सामावतील असा अवकाश नाही. निवडणुकांखेरीज या तरुणाईला गुंतवून ठेवणारी गणेश मंडळं, भागवत सप्ताह, जयंत्या, पुण्यतिथ्या, पुढाऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या क्रीडा स्पर्धा अशा कैक गोष्टी आहेत. असंख्य निरुद्योगी तरुणांच्या हाती मोबाइल आहे. अभिव्यक्तीचं माध्यम म्हणून त्याआधारे लघुपटही बनवले जात आहेत. समाजमाध्यमांवर व्यक्त होण्याची भाषा बदललीय. ‘एकच फाइट वातावरण टाइट’, ‘ए भावा, आता आपली हवा’, ‘ज्यांना आहे किडा त्यांनी समोर येऊन नडा’, ‘कुणी चुकला की आम्ही ठोकलाच’ अशी या अभिव्यक्तीची काही भाषिक रूपं. कुरतडलेल्या जगाचा विसर पाडायला लावणारे आभासी जग अक्षरश: हातातच आहे. त्यामुळे पायाखालचे चटके कधीकधी जाणवत नाहीत इतकंच.



Popular posts
घरातून अपहरण झालेल्या त्या बाळाचा अखेर मृतदेह सापडला ।। हाथरस पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही! ।। आज लातूर जिल्ह्यात 239 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 123 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
हा तर शिक्षकांवर दाखविलेला अविश्वास..
Image
शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो \\ शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक \\ लातुर 162 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 102 नवीन बाधित
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image