उस्मानाबाद: आजच्या इंग्रजी माध्यम तसेच इतर मराठी शाळा पाहता जिल्हा परिषद शाळा म्हटले की आपल्या डोळ्यासमोर उभी राहते एखादी जुनाट दरवाजा तुटलेली खिडक्या मोडलेली अशी जिल्हा परिषद शाळा, परंतु उस्मानाबाद तालुक्यातील आरणी येथील जिल्हा परिषद शाळा पाहिल्यानंतर आपल्या असे लक्षात येईल की लातूर-उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवर असलेली ही शाळा एवढी अद्यावत, रंगरंगोटी केलेली कशी असू शकेल?
या सर्व गोष्टी मागे तेथे कार्यरत आलेल्या शिक्षकांच्या बुद्धिमत्तेचा व कष्टाचा फार मोठा हात आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी तेथे शिक्षक म्हणून रुजू झालेले, याच शाळेमध्ये शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी रावसाहेब घुटे यांचे शाळेचा कायापालट करण्यामध्ये मोठे श्रेय आहे. घुटे सर रुजू झाले त्यावेळी शाळेचा हजेरीपट ८० होता त्यांनी शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवून गावातील इतर विद्यार्थ्यांना व पालकांना गावातील शाळेचे महत्त्व पटवून देऊन अवघ्या दोन वर्षात शाळेचा हजेरीपट २५० वर पोचवला. आज आरणी येथील शाळा संपूर्णपणे डिजिटल आहे शाळेची गुणवत्ता ही वाढली आहे.
शाळेचे मुख्याध्यापक घुटे सरांची ओळख विद्यार्थीप्रिय शिक्षक अशी झाली आहे. या बरोबरच शाळेतील विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात देखील मागे राहिलेले नाहीत, शाळेच्या या भरभराटी मध्ये गावकर्यांचेही सहकार्य मोठ्या प्रमाणात लाभले. आज घडीला सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक नामवंत लोक शाळेला भेट देत आहेत.
भेट देणाऱ्या सर्व पाहुण्यांकडून शाळेतील शिक्षकांचे अभिनंदन होत आहे. आरणी गावच्या नाव लौकिकात शाळेमुळे भर पडली आहे .