पुणे | कोरोनाची लागण झालेले राज्यातील पहिले दाम्पत्य कोरोनामुक्त झाले आहे. पुण्याचे रहिवासी असलेल्या संबंधित दाम्पत्याची दुसऱ्यांदा चाचणी झाली असता, त्याचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत. या रुग्णांना आज डिस्चार्ज दिला जाणार आहे.
मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या दिवशी हॉस्पिटलमधून घरी जायला मिळणार, याचा आनंद हे दाम्पत्य व्यक्त करत आहे. त्याचबरोबर सर्वांनी काळजी घ्यावी, असं आवाहनही त्यांनी जनतेला केलं.
होळीच्या दिवशी म्हणजेच नऊ मार्चला या दाम्पत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दुबईला जाऊन आलेल्या या दाम्पत्यातील पत्नीला आधी कोरोनाचे निदान झाले, त्याच दिवशी पतीचाही अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर त्यांच्या मुलीलाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं.
पती-पत्नीचा 14 दिवसाचा कालावधी संपल्यानंतर परवा या रुग्णांचे एनआयव्ही अहवाल निगेटिव्ह आले होते. त्यानंतर काल दुसऱ्यांदा केलेल्या चाचणीचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे या रुग्णांना आज घरी पाठवले जाईल.