मुंबई | पोलीस आणि नागरिक दोघांनीही स्वयंशिस्त, संयम पाळावा. लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी अमेरिकेत लष्कराची मदत घेण्यात आली आहे. आपल्या राज्यात ती वेळ येऊ न देणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.
कोरोना प्रतिबंधक कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटना कदापिही सहन केल्या जाणार नाहीत, असे हल्ले करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कायद्यानुसार कारवाई केली जाईल,असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.
प्रवासबंदी असताना काही जणांनी दूधाच्या टँकरमध्ये बसून प्रवास केल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. ही बाब चिंताजनक असल्याचं पवारांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आपल्या राज्यातील लोकप्रतिनिधी आणि पत्रकार बांधवांनीसुद्धा ऑनलाइन संवाद साधून सुरक्षितता राखावी, असं आवाहनही अजित पवारांनी केलं आहे.