मुंबई | कोरोना विषाणूचा संसर्ग अधिक फैलावू नये यासाठी राज्य सरकारने नागरिकांवर काही निर्बंध लादले आहेत. आजपासून राज्यात संचारबंदी देखील लागू करण्यात आलेली आहे. शासनाने दिलेल्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यांवर आता गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. तसंच त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे. राज्य सरकार करत असलेल्या उपाययोजना नागरिकांसाठीच चालल्या आहेत एवढंही त्यांना कळू नये, अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
लोकांच्या रस्त्यावर येण्याने कोरोना विषाणू फैलण्यास अधिक मदत होईल. राज्य सरकार नागरिकांसाठी महत्त्वाच्या उपाययोजना करत आहे. यामध्ये नागरिकांचा सहभाग देखील तितकाच महत्त्वाचा आहे. नागिरकांच्या सहभागाशिवाय काम होणार नाही, असं ते म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्रात संचारबंदी लागू करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसंच जिल्ह्यांच्या सीमाही रोखल्या आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सगळी आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.