मुंबई | मुलगा-मुलगी जन्माचा फाॅर्म्युला देऊन ह.भ.प. इंदोरीकर महाराज देशमुख चांगलेच गोत्यात अडकले आहेत. त्यातच त्यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे. कारण इंदोरीकर महाराजांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला जावा, अशी मागणी चांभार समाजाकडून करण्यात आली आहे.
इंदोरीकर महाराजांनी आपल्या कीर्तनात चांभार समाजाचा अवमान केल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडी आणि चर्मकार समाजाने मुंबईतील वर्तक पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. त्यामुळे इंदोरीकरांचं टेंशन वाढणार आहे.
‘चांभाराचा साहेब बनवून त्याला उरावर घ्यायचं काय?, असं वक्तव्य इंदोरीकरांनी आपल्या कीर्तनात केलं होतं. हा चांभार समाजाचा अवमान आहे. त्यांनी सूतार समाजाबाबत अशाच प्रकारचे वक्तव्य केलं आहे, असं तक्रारदारांनी म्हटलं आहे.
या प्रकरणी योग्य तो तपास करुन कारवाई करु, असं पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान, भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी इंदोरीकरांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. त्यामुळे इंदोरीकरांसमोरील अडचणी वाढत असल्याचं दिसतंय.