लातूरः करोनाच्या भीतीमुळे चिकन व्यवसाय कमालीचा अडचणीत सापडला असून २० रुपये किलोने कुक्कुटपालन केंद्रावरून विकल्या जाणाऱ्या कोंबडीचे दर आता इतके घसरले आहेत की कोंबडी सांभाळण्याचा खर्च परवडेनासा झाल्यामुळे कुक्कुटपालक ते मोफत देण्यास तयार झाले आहेत . औसा तालुक्यातील शिवली येथे डॉ . विजय जाधव गेल्या १७ वर्षापासून कुक्कुटपालनाचा व्यवसाय करतात . त्यांच्याकडे सुमारे एक लाख कोंबड्या आहेत . जिल्हयात एकूण उपलब्ध कोंबड्यांची संख्या आठ लाखापेक्षा अधिक आहे . महिनाभरापूर्वी चिकन खाल्ल्यामुळे करोना संभावतो असे वृत्त समाजमाध्यमातून फिरले अन् त्याचा थेट परिणाम बाजारपेठेवर सुरू झाला . अनेकांनी त्यासंबंधी खुलासे दिले . ते वृत्त धादांत खोटे असल्याचे सांगितले मात्र दरातील पडझड जी सुरू झाली ती थांबायलाच तयार नाही . ७० रुपये किलो चिकनचा भाव घसरून २० रुपयांपर्यंत खाली आला . आता विक्रीच होत नाही व कोंबड्यांचा सांभाळण्याचा खर्च करणे परवडत नाही . त्यामुळे फुकट कोंबड्या द्यायला कुक्कुटपालक तयार झाले आहेत . किमान त्यांचा सांभाळण्याचा खर्च तरी वाचेल अशी स्थिती निर्माण झाली आहे . कुक्कुटपालन व्यवसाय हा केवळ करोनाच्या अफवांमुळे अडचणीत सापडला असून कुक्कुटपालकांच्या मदतीसाठी पुढे आले पाहिजे व त्यांनी नागरिकांत जनजागरण केले पाहिजे अन्यथा हा उद्योग कायमचा संपण्याची भीती या क्षेत्रात वर्षानुवर्षे काम करणारी मंडळी व्यक्त करत आहेत .
चिकन व्यवसाय अडचणीत; फुकटात कोंबड्या