लातूर : शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी आणखी एका उड्डाण पुलासह भुयारी मार्गाची गरज असून तसा प्रस्ताव वाहतूक शाखेच्या वतीने पालकमंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे . वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश बंकवाड यांनी महापालिकेच्या परिवहन समितीच्या बैठकीत ही माहिती दिली .
शहरातील वाहतूक समस्येसंबंधी झालेल्या बैठकीत बंकवाड यांनी गूळ मार्केट ते विलासराव देशमुख मार्गाच्या प्रवेशद्वाराच्या कमानीपर्यंत जुन्या रेल्वे स्टेशनपासून उड्डाण पूल तसेच या कमानीपासून दयानंद महाविद्यालयापर्यंत भुयारी मार्गाची गरज असल्याचा प्रस्ताव पालकमंत्री व महापालिकेकडे सोपवला आहे . महापालिकेने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुतळ्यालगतच्या जागेत बसस्थानकाची उभारणी करावी . त्यामुळे गोलाईतील ऑटोरिक्षाही प्रवाशांसाठी बसस्थानकाकडे जातील व गोलाईतून वाहतूकही कमी होईल , असा दावा केला जात आहे . वाहतूक शाखेने हा प्रस्ताव दिला असला तरी तो मंजूर कधी होणार व त्या दृष्टीने आर्थिक तरतूद केली जाणार का , असा प्रश्न मात्र गुलदस्त्यात आहे . उजनीच्या पाण्याप्रमाणेच शहरातील वाहतुकीचा प्रश्न, नविन बसस्थानकाचा प्रश्न, नवीन जागेतील मार्केट यार्ड चा प्रश्न, रस्त्यावर बसलेल्या भाजी विक्रेत्यांचा प्रश्न असे अनेक प्रश्न प्रलंबितच आहेत. फक्त निवडणूका जवळ आल्यावरच अशा प्रश्नांना जाग येते.