लातूर:- दयानंद कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनाविभागाच्या वतीने जनता संचारबंदीच्या संदर्भात जनजागृती करण्यात आली. संपूर्ण विश्वामध्ये कोरोना विषाणूची लागण झालेली आहे. असंख्य लोक मृत्यूमूखी पडले आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग भारतामध्ये रोखण्यासाठी पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्युची घोषणा करून राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देवून दयानंद कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या शंभर स्वयंसेवकांनी साधारणत: तेराशे व्यक्तीमध्ये जनजागृती केली. जनता संचारबंदी चा उद्देश असा आहे की, विषाणूचे आयुष्य साधारणत: पृष्ठभागावर 12 तास आहे आणि जनता कर्फ्यु 14 तासाचा आहे. 14 तासामध्ये ज्या ज्या सार्वजनिक ठिकाणी कोरोनाच्या विषाणू चा संसर्ग झाला आहे अशा ठिकाणी या काळात स्पर्श केला जाणार नाही व आपोआप ही साखळी तुटण्यास मदत होईल. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी आपल्या शेजाऱ्याच्या घरामध्ये जावून व ग्रामीण भागातील ओळखीच्या व्यक्तींना मोबाईलच्या माध्यमातून दि. 22 मार्च ला स्वयंस्फर्तपणे प्रत्येक व्यक्तीने सकाळी 07 ते रात्री 09 वाजेपर्यंत संचारबंदी करावी. सॅनिटायझर चा वापर करावा. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारच्या सूचनांचे पालन करण्याचे सांगितले. 20 व 21 मार्च या दोन दिवसांमध्ये प्रत्येक स्वयंसेवकांनी कमीत कमी 10 ते 12 व्यक्तींना फोन करून आपापल्या घरामध्ये राहण्याची विनंती केली. माननीय पंतप्रधानाचा हा संदेश महाविद्यालयाच्या रा.से.यो. स्वयंसेवकांनी राष्ट्रीय सेवा म्हणून पार पाडली आहे. मागील आठवड्यात ‘कोरोना : लक्षणे व उपाय’ या विषयावर डॉ. राहूल जाधव यांचे व्याख्यान आयोजन करून महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे करण्यात आले.
या उपक्रमामध्ये श्री. विष्णु चांदूरे, श्री. भरत पवार, श्री. अकनगिरे सुकेश, श्री. आत्राम मनोज, श्री. सय्यद तय्यब, श्री. अनवर शेख, कु. अश्विनी पाटील, कु. अंकिता दिक्षीत, कु. देवयानी येळीकर, श्री. अनिल गाडवे, कु. सुप्रिया पाटील इत्यादी स्वयंसेवकांनी यामध्ये सहभाग घेतला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्र.प्राचार्य डॉ. एस. पी. गायकवाड व जिल्हा समन्वयक डॉ. संतोष पाटील यांनी पुढाकार घेतला.