मुंबई | राज्यातला वाढता कोरोनाग्रस्तांचा आकडा हा चिंतेचा विषय बनतो आहे. आज एकाच दिवशी राज्यातली कोरोनाग्रस्तांची संख्या 22 ने वाढली आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा वाढलेला आकडा हा 203 वर पोहचला आहे.
आज नोंद झालेल्या नवीन रूग्णांमध्ये मुंबईचे 10 तर पुण्यातले 5 रूग्ण मिळाले आहेत. तर नागपुरचे 5, अहमदनगरचे 2 तर सांगली, बुलढाणा आणि जळगावातला 1 रूग्ण सापडला आहे. दुसरीकडे आज राज्यात कोरोनामुळे दोन जणांचे प्राण गेले आहेत.
कोरोनातून सावरलेल्या राज्यातला 35 रूग्णांना घरी देखील सोडण्यात आले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांंनी दिली आहे. मुंबईतल्या 40 वर्षीय महिलेचा काल केईएम रुग्णालयात तीव्र श्वसनाविरोधामुळे मृत्यू झाला होता. तर बुलढाणा येथील एका 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू करोनामुळे झाला. तो मधुमेही होता. त्यामुळे राज्यातील करोना बाधित एकूण मृत्यूची संख्या आता 8 झाली आहे.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या जनतेशी आज पुन्हा एकदा संवाद साधला. कोरोनाच्या लढाईत सगळेच एकदिलाने उतरल्याचं समाधान आहे. महाविकास आघाडीबरोबरच विरोधी पक्ष तसंच राज देखील मला फोन करून सूचना देतो आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. संपूर्ण जग सध्या करोनाशी दोन हात करत आहे. कुणीही कुणाच्या मदतीला येऊ शकत नाही. मात्र, महाराष्ट्राला जो काही वेळ मिळाला त्यात आपण आवश्यक ती पावलं उचलल्याचं उद्धव यांनी सांगितलं.