मुंबई : वानखेडे स्टेडियम. गरवारे क्लब हाऊसचे "मैदान'. भाजपचे आमदार आशीष शेलार यांनी एक लांबलचक रनअप घेतला."राऊंड द विकेट' जात त्यांनी बाजूला बसलेल्या फलंदाजाला एक "बाऊन्सर'टाकला. "सगळे तुम्हाला धरुन असतात. आम्हाला पण तशी संधी द्या', असे ते म्हणाले. चेंडू अवखळ होता, म्हटले तर सरपटी होता. यावर तो फलंदाज कसा फटका मारणार याची उत्सुकता साऱ्यांनाच होती. पण तो साधासुधा नव्हे, तर "तेल लावलेला' फलंदाज होता. आपल्या नेहमीच्या संयत शैलीत, कुणालाही झेल न देता, त्यांनी तो चेंडू असा काही खेळून काढला, की अवघे प्रेक्षागृह टाळ्यांच्या कडकडाटाने निनादले.
हा कार्यक्रम होता गरवारे क्लब हाऊसचे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सत्काराचा. त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल गरवारे क्लब हाऊसतर्फे त्याचे आयोजन करण्यात आले होते. या क्लबचे विद्यमान अध्यक्ष आणि भाजपचे नेते राज पुरोहित यांनीच हा घाट घातला होता. या कार्यक्रमात राजकीय टोलेबाजी होणार अशी अपेक्षा होतीच.
मुंबई क्रिकेटचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे आमदार आशीष शेलार यांनी त्यास सुरुवात केली. राज पुरोहित यांनी "पवार हे आपणांस पितृतुल्य आहेत', असे स्तुतिसुमन उधळले होतेच. त्यानंतर मग आपलीही पवारांशी "जवळीक' आहे हे दाखविण्याचा प्रयत्न करीत ते म्हणाले, " पवार ज्या संस्थेशी संलग्न होतात मग ती क्रिकेट असो, गरवारे क्लब असो, कुस्ती, कबड्डी असो वा रयत संस्था असो; या संस्था त्यांना कधीच सोडत नाहीत. सध्या पवारांनी राज्य सरकारला धरून ठेवले आहे... पवारसाहेब आम्हाला पण अशी एक संधी द्या !' यातील राजकीय गुगली श्रोत्यांना बरोबर समजली. एकच हशा पिकला.
यानंतर सत्काराला उत्तर देताना, " खेळाच्या ठिकाणी खेळच असायला हवा. त्यात राजकारण असू नये, असा "हुक'चा फटका मारून शरद पवार म्हणाले, "राजकीय संघर्ष करण्याची वेळ येते, तेव्हा आम्ही जोरदारपणे संघर्ष करतो. तिथे कोणाला सोडत नाही. पण प्रत्येक ठिकाणी राजकारणाची गरज नाही, सर्वांनी मिळून खेळाडूंच्या भवितव्यासाठी प्रयत्न करायला हवेतखेळाडूंच्या समस्या काय आहेत हे जाणून घ्यायला हवे, त्यांच्यासाठी मूलभूत सुविधा तयार करायला हव्यात.' पवारांच्या या "खिलाडूवृत्ती'च्या टोल्याला श्रोत्यांनीही टाळ्यांच्या कडकडाटाने दाद दिली.
सर्वांनी मिळून खेळाडूंच्या भवितव्यासाठी प्रयत्न करायला हवेत.- शरद पवार