जळगाव : गेल्या सरकारच्या काळात तब्बल पाच वर्षे मुंबईच मंत्रालय एकदम सुनंसुनं असायंच, त्या ठिकाणी फक्त फर्निचरची दालनच तेवढी दिसायची परंतु आता सरकार बदलताच मंत्रालय कामासाठी येणाऱ्या माणसांनी खच्चून भरतंय, आम्हाला तर आमच्या मंत्र्याचीही भेट मिळत नाही. यावरून सरकारमधील मंत्र्याकडून काम होण्याबाबत जनतेला पूर्ण विश्वास आहे. हेच दिसून येत आहे. असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे. जळगाव येथे त्या बोलत होत्या. आज मंत्रालयात सर्वच मंत्री जोमाने कामे करीत आहेत. त्यामुळे गेल्या सरकारच्या काळात मंत्रालयात जो शुकशुकाट असायचा ते चित्र आता बदलले आहे. आता मंत्रालय जनतेने खच्चून भरलेले असते. मंत्रीही अगदी जनतेच्या कामासाठी वेळ देत आहेत. अजितदादा तर सकाळी सात वाजेपासून तर रात्री दहा वाजेपर्यंत काम करीत आहेत असे त्या म्हणाल्या. जळगाव येथे आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या, की, राज्यात आपल्या पक्षाचे सरकार आले आहे, त्या माध्यमातून जनतेची कामे करून घेण्यासाठी कार्य केले पाहिजे.
विरोधकांच पोट दुखतंय राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व कॉंग्रेस या तीन पक्षाच्या सरकारबाबत त्या म्हणाल्या, सरकारमध्ये अजितदादा पवार व उध्दव ठाकरे यांचे ट्युनिंग अत्यंत चांगले जमले आहे. कॉंग्रेसच्या मंत्र्यांचीही साथ चागंली आहे. तिन्ही पक्षाच्या सरकारचा संसार अत्यंत चांगला सुरू आहे. त्यामुळे आता विरोधकांच्या पोटात दुखायला लागले आहे.
विरोधकांच पोट दुखतंय- खा. सूप्रिया सुळे